इयत्ता ७वी ते ९वी तील मुलांसाठी! ‘बहुरंगी बहर’- एक अनोखी व्यक्तित्त्व स्पर्धा!

बहुरंगी बहर स्पर्धा


 

‘बहुरंगी बहर’ - ‘हरहुन्नरी’ मुलांचा शोध-प्रकल्प!

Bahurangi Bahar Congratulates

सप्रेम शुभेच्छा!

पावसाळ्याच्या फ्रेश वळणावर आज तुमच्याशी एक धमाल नवा प्रोजेक्ट शेअर करायचा आहे. शाळेतल्या नव्या वर्षात रुळत असताना, तुम्हाला आवडेल आणि सहभागी व्हायला मजा येईल अशी ही स्पर्धा म्हणजेच, ‘बहुरंगी बहर’- उमलणारे व्यक्तित्त्व स्पर्धा !

तुम्ही विचाराल, काय भानगड आहे? आणि कोणासाठी आहे ही स्पर्धा? ... महाराष्ट्रातील सातवी ते नववी इयत्तेतील हरहुन्नरी विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. आता प्रश्न येईल की ‘हरहुन्नरी’ म्हणजे नेमके कोण कोण?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी हे पत्र-

‘बुद्धिमत्ता’ म्हणजे नेमके काय ह्या प्रश्नाचे उत्तर काळानुसार येणाऱ्या शास्त्रीय माहितीच्या आधारे बदलत गेलेले आहे. गेल्या शतकामध्ये जसजसा मानसशास्त्राचा आणि शिक्षणशास्त्राचा विकास होऊ लागला, तसे बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय आणि त्याचे मापन कसे करावे, अशा समस्या संशोधाकांसमोर आल्या. तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, गणिती विचार करण्याची क्षमता, व्यवहाराचे आकलन, सामान्यज्ञान, अडचणींची उकल करण्याचे कसब अशा अनेक गुणांचा अंतर्भाव बुद्धिमत्तेमध्ये केला गेला. त्या आधारे अनेक IQ टेस्ट म्हणजे बुद्धिमापन चाचण्याही उपयोगात आल्या.

हळूहळू लक्षात येऊ लागले की बुद्धीमत्ता काही एवढ्यापुरती मर्यादित नाही. कारण अशा मापनामध्ये उत्कृष्ट असलेले अनेकजण प्रत्यक्ष जीवनामध्ये मात्र यशस्वी ठरतात, असे नाही. अशा निरीक्षणांमुळे दोन विषयांमधल्या संशोधनाला गती मिळाली.

पहिला विषय आला, ‘भावनांक’- भावनिक दृष्टीने जी व्यक्ती अधिक सक्षम ती यशस्वी आणि आनंदी होण्याची शक्यता जास्त. भावनिक सक्षमता येते कशातून? स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची जाण, त्यांचा स्वीकार आणि त्यानुसार केलेले अनुरूप वर्तन! संस्कृतमधला ‘प्रज्ञा’ हा शब्द पारंपरिक व्याख्येतील बुद्धिमत्ता आणि उत्तम भावनांक यांच्या संयोगासाठी वापरला आहे.

दुसरा विषय म्हणजे, ‘Thoughts of multiple intelligence’ अर्थात ‘बहुरंगी बुद्धी’! तबल्याच्या लयतालाचे गणित सहज आत्मसात करणारी व्यक्ती पुस्तकी गणितात कच्ची ठरते... एखाद्या क्रीडाप्रकारामध्ये अप्रतिम कौशल्य दाखवणारी व्यक्ती डबल ग्रॅज्युएट असायलाच हवी असे नाही... कुठल्याही बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण न घेता कर्तृत्ववान उद्योजक बनता येते... व्यवहारामध्ये सतत दिसणाऱ्या अशा अनेक उदाहरणांनी हे सिद्ध केले की, बुद्धीच्या व्याखेला पारंपरिक चौकटीतून मुक्त केले पाहिजे. संशोधाकांनी बुद्धीमत्तेचे ६० च्या वर flavoursशोधले. काही जण अंकांबरोबरची बुद्धिमत्ता घेऊन येतात (प्रा. रामानुज), तर काही सूरलयीची बुद्धिमत्ता (लता मंगेशकर), काहीजण यंत्राबरोबर तन्मयतेने आणि सहजपणे काम करू शकतात, तर काहीजण माणसांबरोबर... काहींची बुद्धी कोणत्याही क्षेत्रातील सिद्धान्ताना हात घालते, तर काहीजण त्या सिद्धान्ताचा व्यवहारात उपयोग करीत एखादे उपकरण तयार करतात.

Bahurangi Bahar Congratulates

गंमत म्हणजे कधीकधी काही माणसे एका पद्धतीच्या बुद्धिमत्तेमध्ये प्रचंड पारंगत असतात, पण त्यात समतोल असतो असे नाही... म्हणजे उत्तम शास्त्रज्ञ हा व्यवहाराला कुचकामी ठरू शकतो, तर अत्यंत निर्मितीक्षम कलावंत काही वेळा जवळच्या नातेवाइकांना ओळखूसुद्धा शकणार नाही.

म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये बुद्धीचे एकापेक्षा जास्त Flavors आहेत आणि त्या व्यक्तीचे आयुष्य सर्वांगाने फुलून येते तो / ती जगण्याचा आनंद तर लुटतेच, पण समाजालाही योगदान देऊ शकते.

या विचारातून या प्रयोगाचा जन्म झाला. आपण जरी ह्या उपक्रमाला ‘स्पर्धा’ असे नाव दिले असले तरी तो एक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय प्रकल्प आहे, असे म्हटले तरी चालेल. उमलत्या वयामध्ये व्यक्तिमत्वाचे असे बहरते पैलू समजापुढे आले तर अशा इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल. या उपक्रमामध्ये भाग घेणाऱ्या आणि पात्रता फेऱ्यांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी भविष्यामध्ये खास विकासशिबिरे, गुणवत्तावर्धक मार्गदर्शन अशा योजना प्रत्यक्षात आणण्याचा आमचा विचार आहे.

या उपक्रमाचे स्वरूप नेमके कसे आहे आणि त्यातील टप्पे कोणते यासंदर्भातील सविस्तर माहिती ‘वयम्’च्या याच अंकामध्ये तुम्हांला वाचायला मिळणारच आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये अगदी प्रथमच हाती घेतल्या गेलेल्या या प्रकल्पाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असा आम्हांला विश्वास आहे.

शुभदा चौकर ( संपादक ‘वयम्’ )
डॉ. आनंद नाडकर्णी ( अध्यक्ष IPH )

बहुरंगी बहर २०१७ च्या स्पर्धेविषयी प्रतिक्रिया –

कृतज्ञता!

प्रिय शुभदामावशी, प्रिय आनंदकाका,

‘वयम् व्यक्तिमत्त्व २०१७’ ची विजेती झाल्यामुळे सगळीकडे भरपूर कौतुक होतंय. ‘वयम्’ टीमचे खूप खूप आभार, कृतज्ञता! आई सांगत असते, “पु.ल. म्हणायचे, कृतज्ञतेइतकं सुंदर काहीच नाही आणि कृतघ्नतेइतकं कुरूप काही नाही.” हे अगदी लक्षात राहिलंय... हा अनुभव दिलात म्हणून कृतज्ञता!!

मी चित्रकलेची परीक्षा सोडून स्पर्धेसाठी आले तेच मुळी नवं शिकता यावं, पाहता यावं म्हणून. ते मी अनुभवलं! गटचर्चा हा माझ्यासाठी एक नवा विषय होता. आमच्या शाळेत ‘Debate’ होतं, (तिथेही एखादा मुद्दा घेऊन भांडायचं कसं हेच शिकवलं जातं! पण Group Discussion हा पूर्ण नवा विषय होता. एखाद्या conclusion ला यायचं तेही नेमकेपणानं, हे मजेदार होतं. सगळीच मुलं बोलकी होती. क्रांतीताईनं आम्हां सगळ्यांची छान काळजी घेतली. तिला ‘Big Hello’!

दुस-या दिवशी मी खूप Relax होते, selection ची भीती अजिबात वाटत नव्हती, पण उत्सुकता मात्र होती. माझं selection जेव्हा झालं तेव्हा मी हवेतच होते... मस्तपैकी उडत उडत; मात्र hot seat वर बसल्यावर एकदम गरमच व्हायला झालं, पण आनंदकाकांनी आम्हांला इतकं cool व relax केलं की भीती मुळी दूरच पळून गेली. विंदांच्या २०-२५ बालकविता तरी मला पाठ आहेत, पण त्यांचं ‘जन्मशताब्दी वर्ष’ आहे हे मात्र मला माहिती नव्हतं, याचं वाईट वाटलं.

या सर्व प्रवासात माझी झोपडपट्टीत राहणारी मैत्रीण यास्मीन हिची निवड होऊनही ती येऊ शकली नाही, याचं वाईट वाटलं. पण ती शिबिराला आली तर चालेल का?

- रिया निधी सचिन पटवर्धन, रत्नागिरी

Respect

एक अनोखी स्पर्धा

बहुरंगी बहर’ ही स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठीही एक सुंदर अनुभव होता. पहिल्या फेरीत विचारलेले ६० प्रश्न मुलांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे होते. या प्रश्नांची उत्तरे लिहिताना मुलांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांची मते अगदी सहजपणे व्यक्त झाली. दुस-या फेरीतही स्वत:चे मत ठामपणे मांडण्याचा आत्मविश्वास मुलांमध्ये दिसला. तिस-या मुलाखत फेरीत डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मुलांना हसतखेळत बोलते केले. त्या २४ तारखेला काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात बसून आम्ही पालक राजकारणापासून खेळापर्यंत, बारामतीच्या हिरव्या नकाशापासून ते नाशिकच्या कुंभमेळ्यापर्यंत लीलया फेरफटका मारून आलो. अभ्यासाबरोबरच अनेक कलाकौशल्ये आत्मसात करत असलेली ही सर्वच मुले किती प्रगल्भ विचार करतात हे आम्हां पालकांना या स्पर्धेच्या निमित्ताने कळले. या स्पर्धेत निवडलेल्या ५० हि-यांना पैलू पडण्याचे कार्य IPH संस्था करणार आहे. डॉ. आनंद नाडकर्णी आणि IPH संस्थेकडून मिळणारे हे मार्गदर्शन या मुलांचे भविष्य समृद्धपणे उजळवेल, यात शंकाच नाही!

-भक्ति अमित कोतवाल

Respect
Testimonial

खूप छान अनुभव

‘बहुरंगी बहर’ ही खूपच छान स्पर्धा आहे. त्यात पहिल्या फेरीत ६० प्रश्नी प्रश्नावली होती. ते प्रश्न EQ व SQ वर आधारित होते. पण ते प्रश्न मात्र चांगलेच अवघड होते बुवा! उदा. प्रश्न क्र.४३ व ४४ - त्यात असे विचारले होते की शिक्षकाने सर्वांसमक्ष तुमची टर उडवली तर तुम्ही काय कराल? मी म्हटलं, ”अरे बापरे, असे माझे एका क्लासमध्येच झाले आहे खरे; पण ते लिहिणार कसे?” एका प्रश्नात तर अमिताभ बच्चन, मोदी, अंबानी, सचिन यांचे चांगले व वाईट गुण लिहायचे होते. मी वाईट गुण इंटरनेटवर शोधले व लिहिणार, इतक्यात बाबा म्हणाले, “या माणसांना आपण स्वत: ओळखत नाही, त्यांच्या वागण्याचा आपल्याला काहीही अनुभव नाही. त्यांच्या स्वभावातल्या न पटलेल्या गोष्टी आपण कशा सांगणार?” ही गोष्ट मला पटली.

दुसरी फेरी म्हणजे गटचर्चा होय. त्यात वेगवेगळे विषय आयत्यावेळी दिले. आम्हांला त्यात पहिला विषय ‘भेदभाव’ हा मिळाला. मला तर प्रश्नच पडला. आईने सांगितल्यानुसार मी कमी, पण मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जर भेदभाव आहे तर तो कशामुळे आहे, मग आपण तो कसा मिटवू शकतो, यांवर बोललो. नंतरचा विषय ‘युनिफॉर्म’ होता. गटचर्चेपेक्षा मी पहिल्यांदाच खूप कमी वेळात ब-याच जणांशी ओळखी बनवल्या, याचे समाधान वाटले.

तिसरी फेरी ‘मुलाखत’ होती. आधी आम्हांला जिल्ह्यांनुसार उभे केले व सगळ्यांना स्टेजवर नेले. त्यांनतर आम्ही खाली प्रेक्षागृहात बसलो. प्रथम त्यांनी आमच्यातल्या एका मुलीला बोलविले व तिला स्टेजवरच्या मधल्या जागेत २०० प्रेक्षकांपुढे बसवले. मी मनातून म्हणालो, ”माझी पाळी आली तर माझी काही खैर नाही.” पण पुढची पाळी माझीच आली. स्टेजवर जाताना जाम भीती वाटत होती. त्यांनी मला काही प्रश्न बुद्धिबळावर, काही माझ्या उत्तरपत्रिकेवर तर काही पेटीवर विचारले. माझ्यासाठी दोन प्रश्न ‘out of box’ होते. ते म्हणजे पेटीचे दुसरे नाव काय? व ‘आळशीपणाचे फायदे’! माझ्यानंतर ब-याच मुलांनी खूप छान गाणी व कविता म्हटल्या. परीक्षकांनी आमच्या ६० उत्तरांचे सखोल वाचन केले होते. आमच्यावर प्रेशर न पाडता तो कार्यक्रम हसत-खेळत पार पाडला. स्टेजवर आनंदकाकांनी खूप सांभाळून घेतले. त्यांनतर बक्षिस समारंभ पार पडला. त्यात मला विजेतेपद मिळाले. मला ही स्पर्धा खूप आवडली.

अद्वैत देसाई
अ.भि.गोरेगावकर शाळा, गोरेगाव, मुंबई
इयत्ता-७ वी

अंतरंगाचा शोध

"technology ने केलाय बाह्यरंगाचा कहर,
अंतरंग शोधूया, स्पर्धा देऊया, बहुरंगी बहर"

बहुरंगी बहर ! मला मिळालेलं एक वेगळंच यश! मुलाखत फेरीनंतर मला जेव्हा कळलं, की मी पहिल्या पाचात आलेली आहे, तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय!
या स्पर्धेमुळे डॉ. आनंद नाडकर्णी, नीलकांतीताई पाटेकर, समृद्धीताई पोरे, मिलिंद भागवत सर, पार्थ मीना निखील सर अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मला खूप जवळून भेटता आले.
या स्पर्धेमुळे माझे स्वतःकडे आणि इतरांकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलले. विचारप्रक्रिया बदलली. माझ्याच वयाची इतर मुलं खूप काय काय करत असतात,हे या स्पर्धेमुळे कळळे. नवे मित्र-मैत्रिणी मिळाले.
IPH आणि वयम् या दोन संस्थांनी मिळून आम्हा मुलांना स्वतःत डोकावायला शिकवलं आहे. या अनुभवामुळे माझ्या ओळखीतले अनेक मित्र-मैत्रिणीही अंतरंगाचा शोध घ्यायला उत्सुक आहेत.
---- वेदिका नरवणे, बदलापूर, इयत्ता -
IES कात्रप विद्यालय , बदलापूर

Respect
Testimonial

स्वतःला समृद्ध करण्याचा प्रवास

"बहुरंगी बहर" या स्पर्धेमुळे माझ्या मुलीमधे तर खूप बदल झालाच आहे, पण आई-बाबा म्हणून आमचं पालकत्व समृद्ध व्हायला लागलं आहे. या स्पर्धेत भाग घेतलेली वेदिका आणि पहिल्या पाचात आलेली वेदिका यातही बराच बदल आम्हा घरातल्या माणसांना जाणवला होता.

आपल्याला बऱ्याच गोष्टी येत असल्या तरी विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत आणि आपल्या क्षमतांचा नीट वापर करता आला पाहिजे, हा समृद्ध अनुभव या स्पर्धेतील मुलाखत फेरीने वेदिकाला आणि पालक म्हणून आम्हांलाही दिला.

‘बहुरंगी बहर’ ही स्पर्धा मुलांच्या जाणिवा विकसित करणारी स्पर्धा आहे. बहुरंगी बहर आणि त्याच प्रवासात पुढे मिळणार्‍या कार्यशाळा म्हणजे मुलांनी स्वतःची प्रत्येक टप्प्यावर ओळख करून घेत स्वतःची स्वतःशीच स्पर्धा करत स्वतःला समृद्ध करणे होय.

IPH आणि वयम् यांचे आम्ही ऋणी आहोत. ‘वयम्’च्या पुढील वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा.

- नेत्रा व हृषीकेश नरवणे, बदलापूर